पालघर दि 21 : बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असून आरोग्य सेवेने हे कुपोषण कमी करण्यासाठी बालकांना आहार तक्त्या नुसार सकस आहार उपलब्ध करून दयावा असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
जव्हार तालुक्यातील वांगणी -वावर या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी डॉ शिंदे यांनी भेट दिली त्यांच्या सोबत आमदार सुनील भुसारा उपस्थित होते.
पावसाळा सुरु झाला असून वांगणी हे दुर्गम पर्जन्यपूरक भाग असल्याने या ठिकाणी जिल्ह्यातील सरासरी पावसा पेक्षा अधिक पाऊस पडतो. पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार, सर्पदंश, बालकाचे आजार गरोदरमाता यांना होणारा संसंर्ग तसेच वृद्धांचे आजार बळावण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्य केंद्राने औषधांचा मुबलक साठा ठेवावा तसेच ज्या गरोदरमाता आरोग्य तपासणी साठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊ नाहीत त्यांना घरपोच आरोग्य सेवा दयावी असे निर्देशहि जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी दिले.
. वावर वांगणी या आरोग्य पथकातील नर्स , डॉक्टर , आणि अन्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक असून सॅम , मॅम अंतर्गत येणाऱ्या बालकांना उत्तम दर्जाचा सकस आहार दिला जातो . गरोदर मातांना अमृत आहार योजने अंतर्गत सकस आहार दिला जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले